बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर काळा दिन तसेच आगामी होणाऱ्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकी बाबत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी वादग्रस्त सीमाभाग त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबल्यामुळे हा दिन सीमा भागामध्ये काळा दिन पाळून मूक सायकल फेरी काढण्यात येते. या काळादिनाबाबत तसेच कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी,नियंत्रण या घटक समितीचे सदस, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अँड. एम. जी. पाटील,कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर,लक्ष्मण होनगेकर,मोनाप्पा पाटील,विठ्ठल पाटील यांनी केले आहे.








