- जीपीएस सुविधेद्वारे शोधता येणार पार्किंगची ठिकाणे
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणेश मंडपांना भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची ठिकाणे शोधताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी GPS आधारित डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते आणि मंडपांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी गणेश मंडप तसेच त्यांच्या जवळील निर्धारित पार्किंगची ठिकाणे डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिली आहेत.
नागरिकांना ganeshdarshan.belagavicitvpolice.in या लिंकवरून संबंधित गणेश मंडप आणि जवळील पार्किंगची माहिती मिळणार आहे. GPS नेव्हिगेशनच्या माध्यमातून इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्गदर्शनही मिळणार असल्याने नागरिकांना पार्किंग शोधणे अधिक सोपे होणार आहे.
पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. गणेश मंडपांना भेट देताना पोलिसांनी निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत. रस्त्यावर किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने पार्क करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेसोबतच शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेवरही पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







