• भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाड येथे बदली

बेळगाव : बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदावर मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला असून, विद्यमान पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी २०१२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची बेळगावच्या नूतन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार भूषण बोरसे यांच्याकडे हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी तात्काळ सोपविण्यात आली आहे. हुबळी-धारवाडचे विद्यमान पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

भूषण बोरसे यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना संवेदनशील परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर दिला. भाषिक, जातीय आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांनी विविध घटकांशी समन्वय साधत काम केले. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम हे २०१२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बेळगाव ग्रामीण भागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे बेळगावच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची त्यांना पूर्वमाहिती आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच विविध संवेदनशील प्रश्न हाताळताना बेळगावच्या पूर्वानुभवाचा प्रकाश निकम यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.