• कर, आरोग्य, नगररचना आणि लेखा समित्यांची निवड प्रक्रिया सुरळीत
  • १७ ऑगस्टला अध्यक्षांची निवड होणार

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या २४ व्या कार्यकाळातील चार प्रमुख स्थायी समित्यांवरील सदस्यांची निवड बुधवारी बिनविरोध झाली. कोणत्याही गोंधळाविना पार पडलेल्या या निवड प्रक्रियेनंतर आता प्रत्येक समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. १७ ऑगस्ट रोजी अध्यक्षांच्या निवडीला अंतिम स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती उपमहापौर हनमंत कोंगळी यांनी दिली.

कर निर्धारण व वित्त समितीवर ब्रह्मानंद मिरजकर, रमेश मैलुगोळ, शंकर पाटील, रविराज सांबरेकर, दीपाली चोपडे, मोदीनसाब मतवाले आणि बसवराज मोदगेकर यांची निवड झाली.

सार्वजनिक आरोग्य व शिक्षण समितीवर श्रीशैल कुंभार, राजू भातकांडे, रूपा चिक्कलदिनी, भागवत नेत्रावती, प्रिया सतगौडा, श्यामोबिना पठाण आणि शहिदखान पठाण यांची निवड करण्यात आली.

नगररचना समितीवर जयंत जाधव, श्रेयस नाकाडी, सविता पाटील, गिरीश धोंगडी, अभिजीत जवळकर, लक्ष्मी लोकरे आणि खुर्शीदा मुल्ला यांची निवड झाली. तर लेखा समितीवर सारिका पाटील, रेश्मा कामकर, माधवी राठोड, जयतीर्थ सवदत्ती, नितीन जाधव, शिवाजी मुल्ला आणि अकाऊंट जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर प्रीती कामकर यांनी सांगितले की, सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून छाननी आणि निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रादेशिक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कर आकारणी, आरोग्य, लेखा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित चारही स्थायी समित्यांची निवड प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना शांततेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक स्थायी समितीवर सात सदस्यांची निवड झाली असून, त्यापैकी एका सदस्याची अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय पाटील आणि जगदीश बेटगिरी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून १७ ऑगस्ट रोजी अध्यक्षांच्या निवडीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती उपमहापौर हनमंत कोंगळी यांनी दिली.

दरम्यान, १५व्या वित्त आयोगाअंतर्गत महापालिकेला १८ कोटी रुपये, तर १६व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध विकासकामांसाठी ३४ कोटी रुपये वितरित झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच कर्नाटकातील सात महानगरपालिकांपैकी ‘CITIIS 2.0’ प्रकल्पासाठी बेळगावची निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.