• जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची कारवाई

बेळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी मोठी कारवाई करत १८ अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, निपाणी, सौंदत्ती, रामदुर्ग, यमकनमर्डी, हुक्केरी, कित्तूर आणि संकेश्वरसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपी सोशल मीडियावर रील्सद्वारे दहशत निर्माण करणे, गांजा विक्री, मटका व्यवसाय चालवणे, नागरिकांना धमकावणे आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार काही आरोपींना ३ महिने, ६ महिने, ८ महिने तर काहींना तब्बल १ वर्षासाठी बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांकडून पुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले आहे.