- मुख्य न्यायाधीशांसह न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बेळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात न्यायालयातील न्यायाधीश, वकील तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः विविध योगासने आणि प्राणायाम करून उपस्थितांना योगाचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले.
दैनंदिन जीवनातील वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही सांगण्यात आले.
या प्रसंगी न्यायालयातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, वकील आणि कर्मचारी यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे जिल्हा न्यायालय परिसरात जागतिक योग दिनाचा सोहळा विशेष उत्साहात साजरा झाला.








