- ग्रामीण भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
- नुकसानभरपाईसाठी आंदोलनाचा इशारा
बेळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी शेती संकटात सापडली असून, अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून बेळगाव जिल्ह्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप ग्रामीण भाजपकडून करण्यात आला आहे. जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी दिला.
यासंदर्भात भाजपच्या जिल्हा आणि तालुका युनिटच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थितीची तातडीने पाहणी करून बेळगाव जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न केल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरणीसाठी प्रति एकर सुमारे २० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेतले आहे. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यारगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांमध्येही पावसाअभावी शेतीची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, सरकारने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे निवेदन पाठविण्यात आले असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुभाष पाटील यांनी दिला.
भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश गणपत पुरी यांनीही सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. बेळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक शेती आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने विलंब न करता शेतकऱ्यांसाठी दुष्काळ मदत जाहीर करावी आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी रयत मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बुदिहाळ, युवराज जाधव, सुभाष तुरमुरी, श्रीधर कुलकर्णी, उमेश पुरी, संतोष हडपद, प्रमोद नुगानट्टी, लक्काप्पा करगी, श्वेता जगदाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








