- सार्वजनिक मंडळांचा १० लाखांपर्यंतचा वीजखर्च जिल्हा प्रशासन उचलणार
- विसर्जन तलाव, रस्ते आणि मूलभूत सुविधांवर प्रशासनाचा भर
बेळगाव : आगामी गणेशोत्सव शांतता, सौहार्द आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग आणि गणेशोत्सव महामंडळांनी तयारीला वेग दिला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा देताना यंदाही १० लाख रुपयांपर्यंतचा वीजखर्च जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका संयुक्तपणे उचलणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. मात्र, वीजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कुमार गंधर्व कला मंदिर येथे जिल्हा प्रशासन आणि गणेशोत्सव महामंडळांच्या संयुक्त बैठकीत गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरातील विसर्जन तलाव, मिरवणूक मार्ग, रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता, पथदिवे, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सागर पाटील आणि लोकमान्य श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी कपिलेश्वर तलावातील जुन्या विसर्जन टाकीचा विस्तार करण्याची मागणी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ नवीन कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
शहरातील शहापूरसह विविध भागांत एल अँड टी आणि गॅस पाईपलाइनच्या कामांमुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजवून विसर्जन मिरवणुकीचे मार्ग सुस्थितीत करण्याची मागणीही करण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस विकास कलघटगी आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे प्रमुख नेताजीराव जाधव यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, मंडप व विसर्जन मार्गांची स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था आणि धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी केली.
उंच गणेशमूर्तींची वाहतूक सुरळीत होण्यासाठी विद्युत तारांची उंची वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. यासाठी हेस्कॉमने सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह विविध विसर्जन तलावांची स्वच्छता, पथदिव्यांची देखभाल आणि धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची कामे महापालिकेकडून केली जातील, असे स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गणेशोत्सवातील सुरक्षा आणि शिस्तीबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली. सार्वजनिक गणेशमूर्तीची उंची १२ फुटांपर्यंतच ठेवावी आणि डीजेला परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. विसर्जन सुलभ करण्यासाठी गणेशमूर्तींना हुक बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरातील सुमारे १४ लाख नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मंडळासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे.रात्री १० नंतर ध्वनिवर्धकाचा वापर करू नये तसेच अश्लील गाण्यांवर पूर्णपणे बंदी राहील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेशोत्सव हा सर्वांचा सण असून कोणताही भेदभाव न करता बंधुभावाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका आणि गणेशोत्सव महामंडळांनी समन्वयाने काम करून उत्सवात येणाऱ्या अडचणी आधीच दूर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर प्रीती कामकर, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम., गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.








