• युवा समितीचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत बेळगाव विभागातील मराठी तसेच इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरती अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.

कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाकडून राज्यभरात सुमारे १५ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बेळगाव माध्यमिक विभागासाठी यापूर्वी ८३१ शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत आणखी २४० पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी कन्नड माध्यमातील GPT पदवीधर प्राथमिक शिक्षकांची ६५ पदे, इंग्रजी माध्यमातील ४ पदे, गणित व विज्ञान विषयासाठी कन्नड माध्यमातील ७४ पदे, जीवशास्त्रासाठी ३३, समाजशास्त्रासाठी ५३ आणि इयत्ता पहिली ते आठवीसाठी संगणक विज्ञान शिक्षकांची ११ पदे जाहीर करण्यात आली आहेत.

मात्र, या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने मराठी भाषिक समाजात नाराजी निर्माण झाली आहे. मराठीसह इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठीही आवश्यक शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश करण्यात आलेला नसल्याने स्थानिक भाषिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा समितीने केला आहे.

बेळगाव विभाग हा बहुभाषिक प्रदेश असून बेळगाव ग्रामीण भागासह खानापूर आणि निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या आहे. या भागातील अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थीसंख्या, विषयांची गरज आणि स्थानिक भाषिक परिस्थितीचा विचार करून मराठी माध्यमासाठी आवश्यक तेवढी शिक्षक पदे मंजूर करणे गरजेचे असल्याचे समितीने म्हटले आहे.

मराठी माध्यमाच्या शासकीय शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि मराठीप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नांमुळे शैक्षणिक वातावरण चांगले असून अनेक शाळांची पटसंख्याही समाधानकारक आहे. मात्र, आवश्यक शिक्षक उपलब्ध न झाल्यास भविष्यात शिक्षकांची कमतरता निर्माण होऊन त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच शाळांच्या पटसंख्येवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, मराठी माध्यमातून डी.एड., बी.एड. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेले अनेक उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत. मराठी माध्यमासाठी पदे उपलब्ध न झाल्यास या पात्र उमेदवारांच्या रोजगाराच्या संधींवरही परिणाम होणार असल्याचे समितीने म्हटले आहे. एका बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असताना दुसऱ्या बाजूला पात्र उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे माध्यमनिहाय शिक्षक पदांचा स्पष्ट समावेश न होणे ही गंभीर बाब असल्याचे समितीने स्पष्ट केले.

बेळगाव विभागासाठी जाहीर करण्यात आलेल्या ८३१ शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेचा तातडीने पुनर्विचार करून १२ ऑगस्टच्या अधिसूचनेत मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा समावेश करावा. तसेच मराठी आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या शाळांसाठी विद्यार्थीसंख्या व शैक्षणिक गरजेनुसार स्वतंत्र पदे मंजूर करावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.