- मुतगा ग्रामस्थांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
- शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : बेळगाव – बागलकोट मुख्य रस्त्यावरील मुतगा गावात गतिरोधक नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन या ठिकाणी तातडीने शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसविण्याची मागणी केली.
मुतगा गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि ‘हायर प्रायमरी स्कूल’ या दोन शाळा असून, दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक या वर्दळीच्या रस्त्यावरून ये-जा करतात. विमानतळाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांचा वेग मोठा असतो. पूर्वी असलेले गतिरोधक हटविल्यानंतर अपघाताचा धोका अधिक वाढल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या ठिकाणी तातडीने शास्त्रीय निकषांनुसार गतिरोधक उभारावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी समस्येची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच योग्य ठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.








