• आरोपी पतीला अटक : टिळकवाडी परिसरातील घटना

बेळगाव : शहरातील टिळकवाडी परिसरात एका क्रूर पतीच्या तावडीत अडकलेली पत्नी आणि तिच्या दोन मुलांची अक्कापथकाने सुटका केली. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे पीडित महिला आणि तिच्या दोन मुलांना सुरक्षितरित्या दिल्लीला पाठवण्यात आले.

महिलेवर तिच्या घरातील बेडरूममध्ये शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याची माहिती दिल्लीहून मिळाल्यानंतर, महिला पोलीस स्थानकाचे निरीक्षक डी. पी. निंबाळकर यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, श्रीमती ए. रुक्मिणी (पीएसआय), आर. आय. कडळगी, स्वशमा गोंधळी, रूपाश्री यमकनमर्डी आणि सिद्धप्पा सांगली यांनी घराचा दरवाजा उघडून महिलेची सुटका केली. सुटका झालेल्या महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि तक्रारीच्या आधारे तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले. पीडितेच्या सुरक्षेसाठी तिला तिच्या मुलांसह विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले.

१७ फेब्रुवारीपासून बेळगावमध्ये कार्यरत असलेल्या अक्कापथकाने आतापर्यंत ७० शाळा-महाविद्यालये, बसस्थानके आणि वसतिगृहांना भेटी देऊन ९१ जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कालावधीत दोन महिलांची सुटका, आठ कौटुंबिक वादांवर यशस्वी तोडगा, तसेच सार्वजनिक ठिकाणी ५५ गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी अक्कापथकाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली असून, महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी हा पथक नेहमी तत्पर असल्याचे सांगितले.