- आठ आरोपींना अटक ; गावात तणाव
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील हन्निकेरी गावात पारंपरिक यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. गावातील जुने राजकीय वैमनस्य या घटनामागील मुख्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात्रेदरम्यान गावातील रहिवासी संगनगौडा पाटील, (वय ५० वर्ष) आपल्या विरोधकांच्या घरासमोर नाचत होते, तेव्हाच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहितीनुसार, यात्रेची मिरवणूक सुरू असताना संगनगौडा पाटील त्यांच्या विरोधकांच्या घरासमोर नाचत होते. यावरून आरोपी गटाने त्यांना “आमच्या घरासमोर नाचू नका, पुढे व्हा” असे सांगितले. या छोट्याशा वादाचा परिणाम आरोपींचा गट अचानक हल्ला करण्यास उतरला आणि कोयते, कुऱ्हाडी, साखळ्या, काठ्या आणि उसाच्या काठ्या यांसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून संगनगौडा यांच्यावर निर्घृण हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात अडकलेल्या संगनगौडा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हन्निकेरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या त्वरित पाठपुराव्यानंतर पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे अशी आहेत: देमप्पा बालगन्नवर, मंजुनाथ बालगन्नवर, रुद्रप्पा बालगन्नवर, विजया बालगन्नवर, सुरप्पा बालगन्नवर, सिद्धप्पा सिंगडी, नागराज बालगन्नवर आणि बसवंतप्पा बालगन्नवर.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जुने वैर या घटनेचे मूळ कारण आहे आणि गावात शांतता राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.








