• मराठी शिक्षक भरतीतील २०० जागांवरून ७८ जागांपर्यंत झालेली कपात रद्द करून किमान ३०० जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे तसेच शरणकुमार निंबाळे यांच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या राजीनामा घेण्याची मागणी केली.

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बेळगाव दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.

यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय, मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनाचा प्रश्न तसेच मराठी शाळांमधील शिक्षक भरतीतील अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली.

कर्नाटक सरकारच्या शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग तसेच विविध संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मराठी माध्यमासाठी २०० जागा मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर या जागांमध्ये कपात करून केवळ ७८ जागा ठेवण्यात आल्याने मराठी भाषिक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि मराठी शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मराठी माध्यमासाठी किमान ३०० शिक्षक पदे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून शरणकुमार निंबाळे यांचा राजीनामा घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर गेल्या सात दशकांहून अधिक काळापासून होत असलेल्या भाषिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय अन्यायाचा मुद्दाही निवेदनातून मांडण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे केंद्र व महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.

मराठी शाळा, मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील जनतेच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या भेटीदरम्यान मराठी शिक्षक भरतीचा प्रश्न, साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा मुद्दा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. युवा समितीच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.