• एअरबॅगमुळे चौघांना जीवदान

खानापूर : खानापूर येथील लोंढा–बेळगाव महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर ग्रँड विटारा कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. शनिवारी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्याने कारमधील चौघांचे प्राण वाचले. सुदैवाने या सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळूर येथील चार जण गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. पर्यटन दौरा आटोपून ते शनिवारी सकाळी बेळगावच्या दिशेने परतत असताना खानापूरमधील नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर हा अपघात घडला.

प्राथमिक अंदाजानुसार, कारचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. त्यामुळे भरधाव कार थेट पुलावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, एअरबॅग तत्काळ उघडल्याने कारमधील चौघांना गंभीर दुखापत होण्यापासून बचाव झाला. त्यांना किरकोळ जखमा आणि मुक्का मार बसल्याचे समजते.

या अपघाताची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.