- मराठा मंदिर येथे दुपारी २ वाजता आयोजन
- पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा महामेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर, रेल्वे येथे आयोजित करण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बुधवार, दि. २ डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्याची परंपरा आहे. मराठी भाषिकांची एकजूट आणि सीमाप्रश्नावरील भूमिका अधोरेखित करणारा हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आयोजित बैठकीत महामेळाव्याच्या तयारीसह जनजागृती, कार्यकर्त्यांची भूमिका आणि नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. समितीच्या कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण समितीचे सदस्य, युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी केले आहे.







