खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येत्या २ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याची जाणीव जागृत ठेवण्यासाठी आणि मराठी भाषिकांची एकजूट दाखवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिवेशनाला विरोध दर्शवत प्रतिमेळाव्याचे आयोजन केले. सीमाप्रश्नावर मराठी भाषिकांची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २ डिसेंबर रोजी कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निषेधात्मक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बेळगावातील धर्मवीर संभाजी चौक, संभाजी उद्यान, शाहापूर, बक्सिन डेपो मैदान किंवा सरदार हायस्कूल मैदान यापैकी एका ठिकाणी महामेळावा होणार असून खानापूर तालुक्यातील प्रत्येक मराठी बांधवाने या महामेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद, ओळख आणि एकजूट दाखवावी. मराठी माणसाच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि अस्मितेच्या जपणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन समितीने केले आहे.

या जनजागृती मोहिमेत खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी आणि समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.