- ३२२ कोटींचा कृती आराखडा
- अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठी २.५० लाख रुपयांपर्यंत रोखरहित मदत
- १०० नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार
बेंगळुरू : राज्यातील रस्ते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने आधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित स्मार्ट कॅमेरे, अपघातप्रवण क्षेत्रांमधील सुधारणा, तातडीच्या वैद्यकीय सेवा आणि जनजागृतीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रस्ते सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीकरिता ३२२ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांनी दिली.
त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या २४ व्या कर्नाटक राज्य रस्ते सुरक्षा प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. रस्ते सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून पोलीस, परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाही २०१८ ते २०२५ या कालावधीत दर १० हजार वाहनांमागील अपघातांचे प्रमाण २७ टक्क्यांनी घटले आहे. हे प्रमाण १७.२८ वरून १२.५६ वर आले आहे. याच कालावधीत मृत्यूदरातही २१ टक्क्यांची घट झाली असून तो ४.५५ वरून ३.५९ वर आला आहे. २०२६ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान राज्यात ३७ हजार ४४३ अपघातांची नोंद झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत अपघातांमधील मृतांची संख्या २२० ने कमी झाली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तसेच अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनांचा शोध घेण्यासाठी ८७ ठिकाणी ए.आय. आधारित स्मार्ट कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २७ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असून, २० ठिकाणी ई-चलन प्रणाली कार्यान्वित झाली आहे. या यंत्रणेद्वारे आतापर्यंत ६ हजार ५०० चलन नोंदविण्यात आले आहेत. उर्वरित ६० ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारने निश्चित केलेल्या अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये (ब्लॅक स्पॉट) अल्पकालीन तसेच दीर्घकालीन सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.
वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. चालक प्रशिक्षण संस्थांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्याबरोबरच वाहन परवाना परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला वाहतूक नियमांबाबतचे जनजागृती व्हिडिओ दाखविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन चालविण्याचे धोके आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याबाबत या व्हिडिओंमधून माहिती दिली जाणार आहे. हे व्हिडिओ पाहिल्याची खात्री करण्यासाठी उमेदवारांची स्वाक्षरी घेण्याची व्यवस्थाही लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अपघातानंतर जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आर्थिक मदतीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. १५ एप्रिल २०२६ पासून लागू असलेल्या ‘पीएम-राहत’ योजनेतून अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत कमाल १.५० लाख रुपयांचे रोखरहित उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. याला पूरक म्हणून ‘मुख्यमंत्री आरोग्य कर्नाटक’ (सीएम-आर्क) योजनेअंतर्गत आणखी एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यामुळे पात्र अपघातग्रस्तांना एकूण २.५० लाख रुपयांपर्यंत उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनांसाठी राज्यातील ३ हजार ४४५ सरकारी आणि खासगी रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली आहे.
आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा प्रतिसाद अधिक वेगवान करण्यासाठी १०८ आणि १०२ रुग्णवाहिका सेवा ११२ हेल्पलाईनशी जोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १०० नव्या बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) रुग्णवाहिकांची खरेदी पूर्ण झाली असून, त्या लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. जिल्हा रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागांचेही आधुनिकीकरण आणि श्रेणीवाढ करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी २०२६-२७ या वर्षात ३२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी २३३.११ कोटी रुपये सुरू असलेल्या कामांसाठी, तर ८८.८९ कोटी रुपये नव्या कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमे, चित्रपटगृहे आणि बस स्थानकांचा उपयोग केला जाणार आहे.
या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







