बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या जागांबाबत अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. सरकारने मराठी माध्यमासाठी २०० शिक्षकांची पदे भरण्याचे आश्वासन दिले असताना प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत केवळ ७८ जागांसाठीच अर्ज मागविण्यात आले आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमातील शिक्षक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जाहीर करण्यात आलेल्या जागांच्या संख्येत तातडीने सुधारणा करून पूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार २०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे.
या मागणीसाठी समितीच्या वतीने मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी मराठीप्रेमी नागरिकांनी आणि संबंधितांनी क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.








