बेळगाव : राज्यातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आपली कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्यावर भर दिला आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार सिंह यांनी बेळगावचा दौरा करून उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीस उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पोलीसप्रमुख रामराजन यांची उपस्थिती होती.
तसेच गदग, बागलकोट, हावेरी, विजयपूर आणि धारवाड जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकही बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती, वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध, पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि विविध भागांतील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
विभागातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. यावेळी एडीजीपी विजयकुमार सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशा सूचना दिल्या.








