बेळगाव : बेंगळुरू येथे आयोजित मिनी ऑलिंपिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दोन युवा खेळाडूंचा भरतेश एज्युकेशन ट्रस्ट आणि बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी आयुषी धामणेकर आणि ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा अर्णव गोद्याळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मिनी ऑलिंपिक स्पर्धेत आयुषी धामणेकर हिने वेटलिफ्टिंगच्या ६१ किलोपेक्षा अधिक वजनगटात सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तर अर्णव गोद्याळकर याने ॲथलेटिक्समधील ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकत आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली.
दोन्ही खेळाडूंनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या कामगिरीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष हिराचंद कलमनी, उपाध्यक्ष सुनील आपटेकर, भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव डॉ. विनोद दोडण्णावर, असोसिएशनच्या सचिव नीता गंगारड्डी, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तथा सहसचिव सदानंद मलशेट्टी, खजिनदार अनुराधा तिगडी, शारीरिक शिक्षण संचालक प्रदीप जुवेकर आणि आकाश मंडोळकर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी दोन्ही पदक विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडाक्षेत्राप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. तसेच युवा खेळाडूंनी अशाच जिद्दीने आणि चिकाटीने आपला क्रीडा प्रवास सुरू ठेवत भविष्यात मोठी यश संपादन करावे आणि जिल्ह्यासह राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.








