• मेंदू, मानसिक संतुलन आणि मर्यादा – मनाचे संगोपन, आत्मविश्वासाची जडणघडण !

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि जैन इंजिनिअरिंग कॉलेज, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, कॉलेजच्या विद्यार्थी समुपदेशन विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी “Brains, Balance and Boundaries” (मेंदू, मानसिक संतुलन आणि मर्यादा) या विषयावर एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या सत्राचे मार्गदर्शन रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी केले. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व, भावनिक संतुलन, तणावाचे व्यवस्थापन, निरोगी वैयक्तिक मर्यादा निश्चित करणे तसेच जीवनातील आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या संवादात्मक कार्यशाळेमुळे सहभागी व्यक्तींना स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे, स्वतःच्या भावना समजून घेणे, निरोगी नातेसंबंध जपणे आणि मनाची काळजी घेणे हे शरीराच्या आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली. निरोगी मन आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडवते, सशक्त समाज निर्माण करते आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचते.