बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅप्पी हार्ट्स फाउंडेशन आणि आसिफ सैठ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजुमन संस्थेत तीन दिवसीय रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या शिबिरात एकूण १,२८० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अंजुमन संस्थेच्या आयटीआय, पीयू कॉलेज, हायस्कूल आणि प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाचे वेळीच निदान करणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे आणि पोषणमूल्ययुक्त आहाराबाबत जागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

प्रकल्पाचे नेतृत्व प्रकल्पाध्यक्षा रोटेरियन पुष्पा परवतराव यांनी केले. रोटेरियन रक्षा उपाध्याय यांनीही शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती एस. मस्तिहोळी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची वेळीच तपासणी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या अंजुमन संस्थेचे व्यवस्थापन, कर्मचारीवर्ग, दोन्ही सहकारी संस्था आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा सामाजिक आरोग्य उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.