- चौघेजण साहित्य पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चौघांना साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य ग्रंथालयातर्फे पहिल्या वर्षीच्या या पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले.
यंदा प्रथम वर्षाच्या पुरस्कारांसाठी प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. द. तु. पाटील आणि पूजा भडांगे यांना डॉ. रमेश वरखेडे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
लोकमान्य ग्रंथालय – वेरेरकर नाट्य संघ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. शाल, श्रीफळ, पुस्तक आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.कवयित्री डॉ. मंगला वरखेडेही व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ. रमेश वरखेडे म्हणाले, जो समाज परिपक्व असतो, त्याला विनोद कळतो. ग्रंथ हे समाजसुख असते. समाजाचे आरोग्य विनोदामुळे टिकते.
अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे होते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय माधव कुंटे व अनुजा पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन बुलकचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी केले.
साहित्यप्रेमी, वाचक, ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या साहित्यसेवेचा यावेळी गौरव करण्यात आला.








