• ३७ प्रकरणे न्यायालयात वर्ग करण्यासाठी ३० हजारांची मागणी
  • दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले

बेळगाव : शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या बेळगाव उपविभागाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर लोकायुक्त पोलिसांनी कारवाई केली आहे. दुय्यम श्रेणी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले पद्माकर पाटील यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

शुभम अप्पाराव यांच्या मालकीची किंवा संबंधित असलेली ३७ प्रकरणे एसी न्यायालयात वर्ग करण्यासाठी पद्माकर पाटील यांनी ३० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून अप्पाराव यांनी लोकायुक्त पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लोकायुक्त पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी दोन हजार रुपयांची आगाऊ रक्कम स्वीकारताना पाटील यांना पकडण्यात आले. लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्त पोलिसांकडून सुरू असून, संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.