- ठाकरे शिवसेनेचा इशारा ; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : बेळगाव येथे २ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महामेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेते व कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी अडविल्यास कर्नाटकच्या मंत्री, आमदार आणि खासदारांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबाबत योग्य समन्वय साधावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र, याच काळात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्यांना सीमेवर रोखण्याच्या घटना घडतात. त्यामुळे सीमाभागात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील प्रतिनिधींना महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच नेते आणि कार्यकर्त्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सीमेवर महाराष्ट्रातील नेते व कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकातील मंत्री, आमदार आणि खासदारांना महाराष्ट्रात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.








