• बेळगावमध्ये ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • बाची रोडवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा

बेळगाव : चित्रपटातील तस्करीच्या दृश्यांना साजेशी शक्कल लढवत मासे आणि बर्फाच्या ट्रेमधून गोव्याची दारू वाहून नेण्याचा प्रकार बेळगावमध्ये उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने बाची रोडवरील वैभव हॉटेलजवळ कारवाई करून लाखो रुपयांची अवैध दारू आणि तिच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उडुपी येथे नोंदणी असलेल्या ‘ओशन फिशर’ या कोल्ड स्टोरेज वाहनातून मासे आणि बर्फाची वाहतूक करण्याच्या आडून गोव्याची दारू मंगळुरूला नेली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क उपनिरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या पथकाने बाची रोडवर वाहन अडवून तपासणी केली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

वाहनातील माशांचे ट्रे बाजूला करून तपासणी केली असता, त्याखाली दारूचे बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळले. त्यामध्ये ‘माल्ट व्हिस्की’ असे नमूद असलेल्या ३५० पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये १८० मिलीच्या ‘बिग बॉस’ ब्रँडीच्या बाटल्या होत्या. जप्त केलेल्या दारूची किंमत ३५ लाख २८ हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी दिली.

दारूच्या बाटल्यांवरून तस्करीच्या मूळ ठिकाणाचा अचूक पत्ता मिळू शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार आणि अवैध वाहतूक करणाऱ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी विभागाने तपासाला गती दिली आहे.

यावेळी डॉ. मंजुनाथ यांनी नागरिकांना बेकायदेशीररीत्या राज्याबाहेरून आणल्या जाणाऱ्या मद्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. अशा मद्याची रासायनिक गुणवत्ता तपासणी झालेली नसते. त्यामुळे कमी किमतीत किंवा शुल्कमुक्त दारू मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडून तिचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील सीमावर्ती भागांमध्ये तपासणी अधिक कडक करण्यात येणार असून, नव्याने तपासणी नाके उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.