- निराधार महिलेच्या पतीवर माजी महापौर विजय मोरे यांच्याकडून सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार
बेळगाव : पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सोशल वर्कर्स टीमने पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडवले. अंत्यसंस्कारासाठी कोणीही नातेवाईक किंवा मदतीला व्यक्ती नसल्याने अडचणीत सापडलेल्या या महिलेच्या पतीवर त्यांनी सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. तसेच महिलेला तिच्या मूळ गावी पाठवण्याचीही व्यवस्था केली.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील एक वारकरी गेल्या महिनाभरापासून बेळगावमधील रेल्वे स्टेशन रोडवरील पदपथावर पत्नीसमवेत राहत होता. रविवारी त्याचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर मदतीसाठी कोणीही नसल्याने संबंधित महिला मृतदेहाशेजारी बसून आक्रोश करत होती.

ही बाब कॅम्प पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच मोरे यांनी सोशल वर्कर्स टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.
बेळगाव महानगरपालिकेचे शववाहन कर्मचारी निशार संशार आणि संजय मेट्री तसेच स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदाशिवनगर येथील रुद्रभूमीत मृत व्यक्तीवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या सामाजिक कार्यात गंगाधर पाटील, पद्मप्रसाद हुली, ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, राजू टक्केकर, शशिकांत आंबेवाडीकर आणि श्यामसिंग राजपूत यांनी सहभाग घेतला. पतीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या महिलेचे सर्वांनी सांत्वन केले. अंत्यविधीसाठी आवश्यक मदत करण्याबरोबरच तिला सुरक्षितपणे छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी पोहोचवण्याची व्यवस्थाही करण्यात आली.
अडचणीच्या काळात एका निराधार महिलेच्या पाठीशी उभे राहून मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








