- ७.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोकाक : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी तपास केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ७ लाख २२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गोकाक येथील विवेकानंदनगर पहिल्या क्रॉसमध्ये राहणारे कैसर उस्मान बाबुसाब देवडी यांच्या घराला चोरट्यांनी १५ ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्य केले होते. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे, हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १५ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यासंदर्भात गोकाक शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी जुने हुबळी येथील कैनअहमद ऊर्फ बाबाजान सुदर्जी (वय ५८) आणि हुसेनसाब कनवळी (वय ३२) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपींकडून ४५.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २६० ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख २२ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेतील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.








