• २ ते ११ डिसेंबरदरम्यान अधिवेशन 
  • प्रशासनाची धावपळ 
  • हॉटेल आरक्षणात तिसऱ्यांदा बदल

बेळगाव : बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या नियोजित तारखांमध्ये राज्य सरकारने पुन्हा बदल केला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशन २ ते ११ डिसेंबर या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

यापूर्वी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार महापालिकेने ६ डिसेंबरपासून शहरातील तसेच परिसरातील हॉटेल्समध्ये खोल्यांचे आरक्षण केले होते. मात्र, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत घेण्याचे ठरले. त्यानुसार २९ नोव्हेंबरपासूनच्या निवास व्यवस्थेचे नव्याने नियोजन करण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल झाल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. नव्या निर्णयानुसार १ ते ११ डिसेंबर या कालावधीसाठी हॉटेलमधील खोल्या आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी हॉटेल मालकांना लेखी पत्र पाठवून नव्या तारखांनुसार खोल्या उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात येत आहे.

अधिवेशनाच्या तारखांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे हॉटेल आरक्षणात फेरबदल करणे, हॉटेल व्यावसायिकांशी समन्वय साधणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नव्याने करणे, अशी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीवरही या बदलांचा परिणाम होत आहे.