• फुलांच्या मागणीत मोठी वाढ ; दरांनी गाठला उच्चांक
  • खरेदीचा उत्साह कायम

बेळगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या अशोकनगर येथील प्रसिद्ध घाऊक फुलबाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. लक्ष्मीपूजन आणि घरांच्या सजावटीसाठी फुले खरेदी करण्याकरिता पहाटेपासूनच बाजारात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. मागणी वाढल्यामुळे फुलांच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली असून, महागाईचा परिणाम खरेदीवर झालेला दिसत नाही.

दिवाळीतील पूजेसाठी आणि सजावटीसाठी गलाटा फुले, झेंडू, पांढरी व पिवळी शेवंती, गुलाब तसेच सुगंधराज यांना विशेष मागणी आहे. स्थानिक शेतकऱ्यांसह आसपासच्या परिसरातूनही विविध प्रकारची फुले विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. फुलांच्या रंगीबेरंगी राशी आणि खरेदीसाठी जमलेली गर्दी यामुळे बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशोकनगरच्या या फुलबाजारात बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसोबतच महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथूनही व्यापारी व खरेदीदार दाखल होत आहेत. त्यामुळे बाजारातील व्यवहारांना मोठी चालना मिळाली असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. वाढलेल्या दरांनंतरही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी केली जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

एकूणच, दिवाळीच्या निमित्ताने बेळगावचा फुलबाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलला असून, वाढलेले दर आणि मोठी मागणी यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.