- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहरातील मराठी नामफलक हटविण्याच्या कथित कारवाईविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता मराठी नामफलक झाकण्यास अथवा काढून टाकण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच अशी कारवाई तातडीने थांबविण्याची मागणी केली.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, १ नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांकडून शहरातील मराठी आणि इंग्रजी नामफलक झाकण्याचे किंवा हटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई प्लेस येथे असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाचा फलकही खडेबाजार पोलिसांनी काढून टाकण्याचा आग्रह धरल्याचे समितीने म्हटले आहे.
अशा प्रकारच्या कारवाईमुळे संघटनेच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. कॉलेज रोडवरील शिवसेना ऑटो स्टँड परिसरात मराठी भाषिकांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक असतानाही कोणतीही पूर्वकल्पना न देता तेथील मराठी नामफलक झाकण्यात आल्याचा आरोप समितीचे नेते अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी केला.

अनेक व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे आपल्या दुकानांवर मराठी नामफलक लावले आहेत. असे फलक हटविण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे येळ्ळूरकर यांनी स्पष्ट केले. काही कन्नड समर्थक संघटनांकडून कायदा हातात घेऊन मराठी नामफलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा घटनांमुळे मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासनाने कोणत्याही संघटनेच्या दबावाखाली न येता मराठी नामफलक हटविण्याची कथित मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी समितीने निवेदनातून केली. पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहिल्यास मराठी भाषिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही समितीच्या नेत्यांनी दिला.
निवेदन सादर करताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे नेते व माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








