• ‘जेल भरो’ आंदोलनात १०० हून अधिक शेतकऱ्यांना अटक
  • बेळगावच्या राणी चन्नम्मा सर्कलवर जोरदार निदर्शने

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या ‘जेल भरो’ आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली. आंदोलनात सहभागी झालेल्या १०० हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते चुन्नाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी गुरुजी आणि प्रेम चौगुला यांचाही समावेश आहे.

आंदोलनाचे नेते चुन्नाप्पा पुजारी आणि शशिकांत गुरुजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बेळगावात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. राणी चन्नम्मा सर्कल येथे शेकडो शेतकरी एकत्र आले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अटक केलेल्या नेत्यांची बिनशर्त सुटका करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. सर्कल परिसरात ठिय्या मांडून त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी प्रमुख रस्त्यावर मानवी साखळी करून वाहतूक रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

शहरात जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी शेकडो आंदोलकांना बळजबरीने ताब्यात घेतले आणि पोलीस वाहनांतून अन्यत्र हलवले. जेल भरो आंदोलनासाठी हिंडलगा कारागृहाकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना काकती येथेच अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून आंदोलन सुरू केले.

ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी हा आदेश जारी केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या आदेशाला न जुमानता आंदोलन सुरू ठेवले.

दरम्यान, उसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी आंदोलन केले होते. आता प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे.