• हुंडीत आढळले अनोखे दानपत्र

सौंदत्ती : घरातील ढेकणांच्या त्रासाला कंटाळलेल्या एका भक्ताने श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा देवीकडे अनोखी प्रार्थना केली आहे. घरातील ढेकणांचा उपद्रव दूर झाल्यास देवीला फळे आणि सुकामेवा अर्पण करणार असल्याचे त्याने पत्राद्वारे कळविले आहे. मंदिरातील हुंडी मोजणीदरम्यान हे पत्र आढळल्याने भाविकांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे.

सामान्यतः भाविक आरोग्य, कौटुंबिक सुख-शांती, रोजगार आणि आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देवीकडे साकडे घालतात. मात्र, एका भक्ताने घरातील ढेकणांच्या समस्येतून सुटका मिळावी, अशी विनंती देवीला केली आहे. ही समस्या दूर झाल्यास फळे आणि सुकामेवा अर्पण करण्याचे आश्वासनही त्याने दिले आहे.

दरम्यान, सौंदत्ती यल्लम्मा मंदिरातील हुंडी मोजणी प्रक्रियेत आतापर्यंत २ कोटी ६९ लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. यामध्ये २ कोटी ३४ लाख रुपये रोख, २६.९५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ७.३२ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

७ मे ते १० ऑक्टोबर या कालावधीत भाविकांनी हुंडीत अर्पण केलेल्या देणग्यांची मोजणी सुरू आहे. एकूण १३९ पिशव्यांपैकी ५४ पिशव्यांमधील देणग्यांची मोजणी पूर्ण झाली असून, अद्याप ८५ पिशव्यांची मोजणी बाकी असल्याची माहिती मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिली.