- दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकावर कोरले नाव
- SGIF स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : दिल्ली येथे आयोजित इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO) स्पर्धेत बेळगावच्या कनक दीपक कंग्राळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत चार पदकांची कमाई केली. कोल्हापूर येथील संजय घोडावत स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या कनकने धावण्याच्या आणि रिले स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेसह बेळगावचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेत कनकने ५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक, तर ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत (हर्डल्स) रौप्यपदक पटकावले. याशिवाय ४००×१०० मीटर रिले आणि ४००×४०० मीटर रिले या दोन्ही सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवत दुहेरी सुवर्णयश संपादन केले.
कनक गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूर येथील संजय घोडावत स्कूलमध्ये प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचा नियमित सराव करत होती. तिच्या मेहनतीला स्पर्धेत यश मिळाले असून, आगामी SGIF (School Games Federation of India) स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या यशामागे शाळेचे प्राचार्य, प्रशिक्षक, आई-वडील आणि आजी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कनक ही बेळगावच्या माजी नगरसेविका शीतल विकास कंग्राळकर यांची नात आहे.
कनकच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, आगामी SGIF स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.








