- रात्री उशिरा कामाची पाहणी
- काम लवकर पूर्ण करून रस्ते खुले करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव : शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामांना गती देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रात्री उशिरा विविध ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केली. गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, असे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.
आमदार सेठ यांनी रामदेव गल्लीतील कडोलकर गल्ली चौकाजवळ ११० मिमी व्यासाची पाईपलाईन जोडण्याच्या कामाची पाहणी केली. तसेच समादेवी गल्लीतील अंजनेय मंदिरासमोर ४५० मिमी व्यासाचा डीआय पाइप बसविणे आणि समादेवी मंदिर परिसरातील पाईपलाईन जोडणीसाठी उर्वरित अंतर भरण्याच्या कामाचा आढावा घेतला. किर्लोस्कर रस्त्यावर ६३ मिमी आणि ९० मिमी व्यासाचे एचडीपीई पाइप बसविणे तसेच माती भरण्याचे काम पूर्ण झाल्याचीही त्यांनी पाहणी केली.
शहरातील हे भाग प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. पाईपलाईनच्या कामांमुळे दुकानदार, व्यापारी, वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांना गैरसोय होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याची सूचना आमदारांनी केली. कामाच्या ठिकाणी आवश्यक नियोजन करून विलंब न लावता कामे पूर्ण करावीत आणि रस्ते लवकर खुले करावेत, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
या पाहणीवेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.







