• भटक्या कुत्र्यांनी ओढल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस
  • कागवाड रस्त्यालगतची घटना
  • स्थानिकांच्या माहितीवरून पोलिसांकडून घटनास्थळी तपास

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराबाहेर कागवाड रस्त्यालगत नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भटके कुत्रे मृतदेह ओढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

रस्त्याच्या कडेला काही भटके कुत्रे एक वस्तू ओढत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. जवळ जाऊन पाहिले असता, ती वस्तू नवजात बाळाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कुत्रे मृतदेह ओढत असल्याचे आणि त्याचे लचके तोडत असल्याचे पाहून स्थानिकांना मोठा धक्का बसला.

या घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. नवजात बाळाचा मृतदेह तेथे कसा आला, याबाबतचा अधिक तपशील तपासातून समोर येणार आहे.