- अथणी तालुक्यातील अरटाळमध्ये शोककळा
- मुलाचे पार्थिव पाहून वडिलांचा आक्रोश, मित्रांनी जागवल्या आठवणी
अथणी : उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावलेले बंगळूर सीसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण साळुंके यांचे पार्थिव अथणी तालुक्यातील त्यांच्या अरटाळ या मूळ गावी आणण्यात आले. आपल्या लाडक्या मुलाचे पार्थिव पाहताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश आणि नातेवाईकांसह ग्रामस्थांचा शोक अनावर झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अरुण साळुंके हे पाच मित्रांसमवेत श्रद्धेने चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडला गेले होते. मात्र, यात्रेदरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव गावी पोहोचल्यानंतर अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात आली. अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय मान्यवर, पोलीस क्षेत्रातील सहकारी, मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
मुलाच्या निधनाने व्यथित झालेले त्यांचे वडील मनोहर साळुंके यांना दुःख अनावर झाले. ‘देव सज्जनांचे रक्षण करतो, ही श्रद्धा आता खोटी ठरली,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत भक्तिभावाने यात्रेला गेलेल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत होईल, याची कल्पनाही केली नव्हती, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. सर्वांशी प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण वागणाऱ्या मुलाच्या आठवणींनी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

अरुण साळुंके यांचे मित्र आणि केएएस अधिकारी अशोक मिर्झी यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनापासून अरुण यांच्याशी मैत्री होती. आपण पोलीस कॉन्स्टेबल असताना अरुण यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याला केएएस परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि अधिकारी होण्याचा आत्मविश्वास दिला, असे मिर्झी यांनी सांगितले.
बेळगावमधील एकत्रित प्रशिक्षणाचे दिवस, दिल्लीतील प्रशिक्षणादरम्यानचे अनुभव आणि मित्रांच्या यशासाठी अरुण यांनी दिलेले प्रोत्साहन अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मनमिळाऊ स्वभाव, सहकाऱ्यांना मदत करण्याची वृत्ती आणि मित्रांच्या प्रगतीसाठी धडपडणारा सहकारी गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अरुण साळुंके यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








