- कर्नाटक पोलिसांकडून नेते व कार्यककर्ते ताब्यात
बेळगाव : काळ्या दिनानिमित्त बेळगावमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी निपाणी टोलनाक्यावरच रोखत ताब्यात घेतले. बेळगाव प्रवेशबंदीचे आदेश झुगारून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविल्याने यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. या घटनेमुळे सीमाभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काळ्या दिनानिमित्त बेळगावमध्ये आयोजित निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशावर बंदी घातल्याने निपाणी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत शिवसैनिकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.
पोलिसांनी विजय देवणे, विराज पाटील, प्रकाश पाटील, राजू यादव, विनोद खोत, सताप्पा नरके, अवधूत साळोखे, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, दीपाली घोरपडे, विशाल देवकुळे, सागर पाटील, विकास पाटील, सतीश पाणारी आणि सरदार टिप्पे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सीमाभागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.








