खानापूर : प्रभुनगर पुलाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. नारायण परशुराम कुंडेकर (रा. महादेव गल्ली, राजहंसगड, बेळगाव) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (२० ऑक्टोबर) रात्री सुमारे ११.३० वाजता ही दुर्घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण कुंडेकर हे होंडा शाईन दुचाकीवरून गणेबैल येथून बेळगावच्या दिशेने जात होते. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ ए वरील प्रभुनगर परिसरात ते सर्व्हिस रस्त्यावरून प्रवास करत असताना पुलाजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरून अपघात झाला.

या दुर्घटनेत कुंडेकर यांच्या डोक्याला, हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.