बेळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारातील अनियमितता व देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे वगळून त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात शुक्रवार दि . १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य घटना बचाव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अनिल आजगावकर होते.

प्रगतिशील लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. गेल्या काही वर्षांपासून देशभरातील १३ कोटी मतदारांची नावे वगळून त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. या कृत्याला जबाबदार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार ते काम करत आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून ज्ञानेश कुमार व मोदी सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. सर्व संस्थांचे कार्यकर्ते व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. यासाठी सकाळी साडेदहा वाजता सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

समाजवादी कार्यकर्त्या निला आपटे, प्रा. दत्ता नाडगौडा, एस. आर. पाटील, मधु पाटील आदींनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या. रामदेव गल्लीतील जीवन विवेक प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस प्रगतिशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जीवन विवेक प्रतिष्ठान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.