बेळगाव : येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हिंदी प्रचार सभेतर्फे आयोजित भाषण, निबंध आणि काव्यगायन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले.
भाषण स्पर्धेत आरती गोरल हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर साफिया गहापूरवाले हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. निबंध स्पर्धेत पल्लवी पाटील, आरती चौजुले आणि शिवानी मलतवाडकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. तसेच काव्यगायन स्पर्धेत सानिया पाटील हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.
या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख नीता पाटील, प्रा. ताटे आणि डॉ. अमित चिंगळी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.








