• २०१७ मधील एसटी बस स्वागत प्रकरण
  • पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये

बेळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याच्या निर्णयानंतर बेळगावात दाखल झालेल्या बसचे स्वागत केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोषारोप निश्चित केले आहेत. जेएमएफसी द्वितीय न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली असून, पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

२०१७ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या नव्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचा आदेश दिला होता. कर्नाटकचे तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याबाबत घेतलेल्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली बस प्रथमच बेळगाव बसस्थानकात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मदन बामणे, गणेश दड्डीकर, सूरज कणबरकर आणि मेघन लंगरकांडे यांनी बसचे स्वागत केले होते. यावेळी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या.

या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १५३ (अ) तसेच सहकलम १४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बसचालक देविदास हरी बोराट आणि वाहक प्रमोद शंकर गायकवाड यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांची केस स्वतंत्र करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित कार्यकर्त्यांवरील खटल्यात जेएमएफसी द्वितीय न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणात ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. अश्वजीत चौधरी हे कार्यकर्त्यांच्या वतीने काम पाहत आहेत.