बेळगाव : बेळगाव शहरातील यंदाचा गणेश विसर्जन सोहळा तब्बल ४२ तास अखंडपणे सुरू राहिला. कपिलेश्वर तलाव आणि जक्कीन होंड परिसरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याने बेळगावच्या गणेशोत्सवाची भव्यता पुन्हा एकदा अधोरेखित केली. रात्रंदिवस सुरू असलेल्या मिरवणुकीत भक्ती, उत्साह आणि पारंपरिक जल्लोषाचा अनुभव भाविकांनी घेतला.

चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिगीते, ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी विशेष आरती व पूजा करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

माळी गल्ली मंडळाच्या गणेश मूर्तीचे पहिले विसर्जन करून मिरवणुकीला अधिकृत सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात गणेश मूर्तीची महाआरती करण्यात आली.

भव्य गणेशमूर्ती, मोठ्या संख्येने सहभागी झालेली मंडळे आणि अंतिम मिरवणुकीचा प्रचंड आकार यामुळे विसर्जन प्रक्रियेला वेळ लागला. आगामी काळात मूर्तींची उंची आणि विसर्जनाची वेळ याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो भाविकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावले. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव पार पडल्याबद्दल पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

  • महापालिकेच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने ऐतिहासिक मिरवणुकीची सांगता

गेल्या ४२ तासांपासून सुरू असलेल्या गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता बेळगाव महापालिकेने स्थापन केलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली. विसर्जनापूर्वी महापालिकेच्या गणेशमूर्तीची महाआरती करण्यात आली. यावेळी उपमहापौर हनुमंत कोंगळी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अभियंता लक्ष्मी निपाणीकर, पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महाआरतीनंतर डोल-ताशांच्या गजरात परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपमहापौर हनुमंत कोंगळी, आयुक्त कार्तिक एम. आणि अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही डोल-ताशांच्या तालावर सहभागी होत उत्सवाचा आनंद व्यक्त केला.

कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत महापालिकेच्या गणेशमूर्तीचे कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ४२ तासांच्या या विसर्जन सोहळ्याची सांगता होत असताना भक्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता दिसून आली.