• कपिलेश्वरसह शहरातील विसर्जन तलावांवर दोन दिवसांत सर्व सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश

बेळगाव : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कपिलेश्वरसह शहरातील विविध विसर्जन तलाव आवारात सुरू असलेल्या तयारीची महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली.

विसर्जनाच्या दिवशी तलाव परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन तसेच गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

तलाव परिसरात क्रेन, पाणी, विद्युत रोषणाई, मंडप आणि ध्वनिवर्धक यंत्रणेची व्यवस्था करण्यासोबतच पोलीस, अग्निशमन दल आणि जीव रक्षक पथकांची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध विभागांशी समन्वय साधून दोन दिवसांत सर्व आवश्यक सुविधांसह तयारी पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

तयारी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तलाव परिसराची पाहणी करून अंतिम टप्प्यातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त कार्तिक एम. यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापालिका अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर सुळगेकर, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह महापालिका अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते.