- सिद्धी महिला मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- विद्यार्थी, महिला विक्रेते आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे आवाहन
बेळगाव : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ विद्यार्थी, महिला विक्रेते आणि नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी सिद्धी महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात समाजसेविका सुनीता सुभेदार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
पहिल्या रेल्वे गेटजवळ अनेक छोटे विक्रेते व्यवसाय करतात. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी असून, परिसरात वापरण्यायोग्य स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाअभावी परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच बेळगावपासून दूर असलेल्या विविध गावांमधून अनेक विद्यार्थी या ठिकाणी येतात. पहिल्या रेल्वे गेटजवळील बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करताना त्यांना बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांसाठीही स्वच्छतागृहाची सुविधा आवश्यक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
यापूर्वी महापालिका आयुक्त विद्या कुमार तलवार यांची भेट घेण्यात आली होती. महापालिकेकडून स्वच्छतागृह बांधून देण्याची तयारी दर्शविण्यात आली असून, त्याची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधितांकडे असेल, असे सांगण्यात आल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पहिल्या रेल्वे गेटजवळील बस थांब्यावर सशुल्क स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सशुल्क सुविधा ठेवल्यास त्याच्या देखभालीचा खर्च भागविणे शक्य होईल आणि विद्यार्थी, विक्रेते तसेच गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मंडळाने म्हटले आहे.
यावेळी सविता एस. हेब्बार, सुनीता सुभेदार, नीता व्ही. कुडतुरकर आणि अर्चना ए. पटेल आदी महिला सदस्या उपस्थित होत्या.








