• एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या दिवशी बेळगावच्या चव्हाट गल्लीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मध्यरात्री घरातून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या आणि काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०), प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) यांचा मृत्यू झाला. तर गजानन दमोने (६५) आणि रोशन दमोने (२१) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दमोने परिवारासाठी गणेश चतुर्थीचा दिवस आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखद आठवणीत बदलला. ज्या दिवशी घरात गणरायाच्या आगमनाचा आनंद असायला हवा होता, त्याच दिवशी चार जणांचे मृतदेह बाहेर काढावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने चव्हाट गल्लीसह संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. ही हृदयद्रावक घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आगीचे नेमके कारण तसेच दुर्घटनेबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.