• वाहतूक, पार्किंग व्यवस्थेचा घेतला आढावा
  • गर्दी नियंत्रणासह कायदा व सुव्यवस्थेच्या उपाययोजनांवर चर्चा

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नूतन शहर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिरवणूक मार्गावरील वाहतूक व्यवस्था, वाहनांच्या पार्किंगची सोय, गर्दीचे नियोजन तसेच गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रकाश निकम यांनी शहरातील विविध पोलिस ठाण्यांना भेटी देऊन प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच काळ्या यादीतील गुन्हेगारांची ओळख परेड घेण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेची तयारी आणि सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सकाळी त्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

  • वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावर भर

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था करणे आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, ही पोलिसांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

या पार्श्वभूमीवर आयुक्त निकम यांनी मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यांनी आढावा घेतला.

यावेळी पोलिस उपायुक्त नारायण बरमणी, सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) जोतिबा निकम, मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक एम. के. धामण्णावर यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.