बेळगाव : येथील श्री सोमनाथ मंदिर, ताशिलदार गल्ली परिसरातील कराटे प्रशिक्षण केंद्रात बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इंडियन कराटे क्लबच्या एकूण ७५ कलर बेल्ट कराटेपटूंनी सहभाग घेतला.
या परीक्षेत वर्धन चौगुले, सायली गुंडकल, समीक्षा गुंडकल आणि जानवी मास्तमर्डी या चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळविण्याचा मान पटकावला. हे चारही विद्यार्थी मागील आठ वर्षांपासून सोमनाथ मंदिर, तहसीलदार गल्ली येथील कराटे क्लासमध्ये सातत्याने सराव करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कराटे स्पर्धांमध्ये सहभाग घेत पदके मिळविली आहेत.
त्यांच्या सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीची दखल घेत इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते चारही विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
चारही ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत, भाजप नेते किरण जाधव, भातकंडी स्कूलचे अध्यक्ष मिलिंद भटकंडे तसेच एकलव्य पुरस्कारप्राप्त जलतरणपटू राजेश गजानन शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबचे परशुराम काकती, प्रभाकर किल्लेकर, विठ्ठल भोजगार, श्रेया येळूरकर, सिद्धार्थ तहसीलदार, अमिषा होनगेकर, सात्विक शानभाग, वैष्णवी होणगेकर आणि तेजस्विनी देसाई यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन भरमा पाखरे (पिंटू) सर यांनी केले.








