बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) द्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर फुलांनी सजवण्यात आले असून मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपावरही रोषणाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत जन्माष्टमी चा कार्यक्रम चालणार आहे. मंदिरात पहाटे मंगल आरती त्यानंतर शृंगार दर्शन, गुरु पूजा आणि श्रीमद् भागवत प्रवचन झाल्यानंतर दिवसभर भजन, कीर्तन सुरू राहणार असून सायंकाळी पाच वाजता अभिषेक, नाट्यलीला , रात्रि अकरा वाजता विशेष कृष्ण कथा आणि मध्यरात्री महाआरती होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.

  • श्रीकृष्ण कथानकाचा समारोप

मंदिरात २९ ऑगस्ट पासून रोज सायंकाळी सात वाजता परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी श्रीकृष्ण कथा सांगितली. त्याचा समारोप गुरुवारी सायंकाळी झाला.

दरम्यान बुधवारच्या कथानकाप्रसंगी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंधातील ६६ व्या श्लोकाचे वर्णन केले .पौंड्रक राजा व भगवान श्रीकृष्ण यांच्यातील युद्धाचा प्रसंग त्यांनी कथन केला. स्वतःच भगवान आहे असे सांगणाऱ्या आणि श्रीकृष्णासारखेच वेष परिधान करणाऱ्या असुरी वृत्तीच्या पौंड्रक राजाचा आणि त्याचा मित्र काशीराज यांचा श्रीकृष्णांनी कसा वध केला याचे वर्णन महाराजांनी केले.

गुरुवारी महाराजांनी श्रीमद् भागवतातील दहाव्या स्कंधातील ६७ व्याअध्यायाचे वर्णन केले. यावेळी बोलताना भगवान श्रीकृष्ण जे काही करतात ते सर्वांच्या भलाईचेच असते असे ते म्हणाले. शुकदेव गोस्वामिनी केलेल्या वर्णनाचे कथन महाराजांनी केले.