• कटकोळ पोलिसांची मोठी कारवाई
  • मोबाईल चोरीच्या प्रकरणात ८ जणांना अटक

बेळगाव : जिल्ह्यात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असतानाच कटकोळ पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना अटक करून ४० मोबाईल फोनसह दोन वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ११ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान मोबाईल चोरीच्या टोळीचा माग काढत आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान विविध कंपन्यांचे ४ लाख ९४ हजार २०० रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

याशिवाय १ लाख ३४ हजार २०० रुपये किमतीचे इतर साहित्य तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली ५ लाख ४० हजार रुपये किमतीची दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ११ लाख ६८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.